Akshay Kumar : आपण जेव्हा थिएटरमध्ये चित्रपट बघायला जातो तेव्हा दोन गोष्टी घडतात ज्याची परंपरा बनली आहे. ज्यामध्ये प्रथम राष्ट्रगीतासाठी उठणे आणि दुसरे म्हणजे नंदू हॉस्पिटलच्या बाहेर उभे राहून सिगारेट ओढताना दिसत असतो. मात्र, आता ही सवय बदलली आहे. कारण नंदू आता मोठा पडद्यावर दिसणार नाही. अक्षय कुमार आणि नंदूच्या या जाहिरातीचीही एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे आणि केवळ फॅन फॉलोइंगच नाही तर या संपूर्ण जाहिरातीचे रूपांतर अनेक प्रकारच्या मीम्समध्ये देखील झाले आहे. पण आता ही जाहिरात चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावर दिसणार नाही.
अशा खूप कमी जाहिराती आहेत ज्या आयकॉनिक म्हणून उदयास येतात. अक्षय कुमार आणि नंदूची ही जाहिरातही सारखीच होती. या जाहिरातीमध्ये अक्षय कुमार हा नंदू नावाच्या व्यक्तीला सिगारेट ओढण्यापासून अडवत असतो. मासिक पाळीत घाणेरडे कपडे वापरल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्ला नंदूला देत असतो. आता अक्षय कुमार आणि नंदूची ही जाहिरात सेन्सॉर बोर्डाने बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय आणि नंदूची जाहिरात कधी आली?
माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2012 मध्ये एक असा आदेश दिला होता. ज्यामध्ये धुम्रपानाची दृश्ये असलेले चित्रपट दाखवण्यापूर्वी अशा जाहिराती सल्लागार म्हणून चालवाव्यात असा आदेश दिला होता. ज्यामध्ये चित्रपट सुरु होताना आणि चित्रपटाच्या मध्यांतरानंतर ही जाहिरात दाखवायचा आदेश होता. यामध्ये पहिली जाहिरात ही मुकेशची होती. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा तरुण वयात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाने मृत्यू झाला. या जाहिरातीनंतर अक्षय कुमारची जाहिरात 2018 मध्ये आली.
अक्षय कुमार आणि नंदूची जाहिरात का काढली?
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या आदेशानुसार 2018 मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि नंदूची जाहिरात मोठ्या पडद्यावर लावण्यात येत होती. या जाहिरातीत नंदूची भूमिका साकारणाऱ्या अक्षयसोबत अजय सिंग पाल दिसला होता. हळूहळू ही जाहिरात खूप व्हायरल झाली. एक चांगली गोष्ट म्हणजे अक्षय कुमार आणि नंदूची ही जाहिरात अनेक वर्षे काढली नव्हती. त्यामुळे ही जाहिरातीची प्रत्येक ओळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
आता 6 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि नंदूची ही जाहिरात काढून टाकली जाईल आणि तिच्या जागी एक नवीन जाहिरात येणार आहे. ज्यामध्ये तंबाखू सोडण्याचे फायदे सांगितले जाणार आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘जिगरा’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या दोन्ही चित्रपटादरम्यान अक्षय कुमार आणि नंदूची जाहिरात दाखवण्यात आली नाही.