Flight Plays Adult Movie: ऑस्ट्रेलियातील क्वाँटास एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक क्यूएफ59 मध्ये एकच फारच विचित्र प्रकार घडला आहे. सिडनीवरुन जपानमधील हानिडा येथे जाणाऱ्या विमानामध्ये अचानक सर्वांच्या सीटसमोरील स्क्रीनवर अडल्ट चित्रपट सुरु झाला. विमानात अनेक महिला आणि लहान मुले प्रवास करत असतानाच अचानक एकाच वेळी सर्व स्क्रीनवर ‘डॅडीओ’ नावाचा 2023 मधील चित्रपट सुरु झाला. हा आर रेटेड चित्रपट असून यामध्ये अश्लील दृष्य, नग्नता आणि लैंगिकतेसंदर्भातील कंटेट आहे. हा चित्रपट अचानक सुरु झाल्याने प्रावाशांबरोबर विमानातील कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडाला.
कोणालाच बदलता येत नव्हता स्क्रीनवरील चित्रपट
विमानातील मनोरंजन यंत्रणा अचानक बंद पडल्यासारखी झाली आणि ती प्रवाशांना वापरता येत नव्हती. प्रवाशांना चित्रपट निवडता येत नव्हता. इतर चित्रपटांऐवजी सर्वांच्या स्क्रीनवर एकाच वेळी ‘डॅडीओ’ हा चित्रपट प्ले होत होता. या चित्रपटातील अडल्ट दुष्यही सर्वांना नाइलाजास्तव पहावी लागल्याने विमानामध्ये अनेकांना फारच अवघडल्यासारखं झाल्याचं याच विमानातील एका प्रवाशाने सांगितलं.
रेडिटवर शेअर केला अनुभव
विमानातील एका प्रवाशाने तर रेडिटवर हा अनुभव शेअर केला आहे. “हा चित्रपट थांबवताच येत नव्हता. हा चित्रपट ना थांबवता येत होता ना बंद करता येत होता. विमानातील सर्वांनाच यामुळे अवघडल्यासारखं झालं. खास करुन कुटुंबाबरोबर आणि मुलांबरोबर प्रवास करणाऱ्यांची विशेष गोची झाल्याचं दिसून आलं,” असं या प्रवाशाने म्हटलं आहे. अनेकांनी विमानात हा असा चित्रपट पाहणं फारच विचित्र असून या सेटअपमध्ये असा चित्रपट पर्याय म्हणूनही ठेवंणं चुकीचं आहे, असं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे.
कधी बंद झाला हा चित्रपट?
या विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्वांना त्यांना कोणता चित्रपट बघायला आवडेल हे विचारलं. मात्र त्यानंतर हा अडल्ट चित्रपट सुरु झाला. हा चित्रपट थांबवता येत नसल्याने कर्मचारी तसल्या दृष्यांच्या वेळी प्रवाशांचं लक्ष स्क्रीनवर न राहता दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न हे कर्मचारी करत होते. मात्र हा चित्रपट थांबवून दुसरा चित्रपट लावण्याचा जवळपास तासभर प्रयत्न केल्यानंतर यश आलं. या विमानातून प्रवास करणाऱ्या पालकांनी आम्हाला काय करावं कळतं नव्हतं असं सांगितलं. हे फारच विचित्र होतं. कर्मचारी बरेच प्रयत्न करत होते. मात्र त्यांना हा चित्रपट स्क्रीनवरुन हटवण्यात किंवा बंद करण्यात अपयश येत होतं.
कंपनीने जारी केलं पत्रक
या प्रकरणानंतर क्वाँटास एअरलाइन्सने एक पत्रक जारी केलं आहे. प्रवक्त्यांनी जारी केलेल्या या पत्रकामध्ये विमान कंपनीने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “हा चित्रपट विमानातील सर्वांसाठी प्ले करणं नक्कीच योग्य नव्हतं,” असं कंपनीने म्हटलं आहे. सर्व प्रवाशांची कंपनीने दिलगीरी व्यक्त केली असून विमानात कोणते चित्रपट प्रवाशांना पर्याय म्हणून उपलब्ध करुन दिले जावेत याचा फेरविचार केला जाईल असंही कंपनीने म्हटलं आहे.
नेमकं घडलं काय शोध सुरु
सध्या क्वाँटास एअरलाइन्स हा सारा प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेत आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मुळात घडलं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.