बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या ‘सिंघम’ आणि ‘सिंघन रिटर्न्स’ने याआधी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे सिंघम अगेनकडूनही फार अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, तो पाहिल्यानंतर मात्र सर्वांना ट्रोल केलं जात आहे. सिंघम दिवाळीत प्रदर्शित होणार असून या चित्रपटासमोर ‘भुल भुलैय्या 3’चं आव्हान असणार आहे. मात्र या चित्रपटामुळे अजय देवगणची चर्चा सुरु आहे.
अजय देवगणला मास हिरो म्हणून ओळखलं जातं. अजय देवगणचा एक मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान इतर अभिनेत्यांप्रमाणे अजय देवगणचेही अनेक डुप्लिकेट आहेत. अजय देवगणची स्टाईल कॉपी करताना त्याचे डुप्लिकेट एक खांदा खाली वाकवतात. पण या स्टाईलमागे नेमकं कारण काय हे अजय देवगणने स्वत: सांगितलं आहे.
अजय देवगणने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बालपणापासूनच आपल्याला अशी सवय असल्याचं सांगितलं. खांदा थोडा खाली आणि वाकडी मान हे आधीपासून आहे. ते जन्मापासून आहे त्याला मी काही करु शकत नाही असं अजय देवगणने सांगितलं. तसंच कोणत्याही दिग्दर्शकाने याबद्दल तक्रार केलेली नाही अशी माहितीही त्याने दिली. प्रत्येक अभिनेत्यात काही कमतरता असतात, काहींच्या लक्षात येतात काहींच्या नाही असंही अजय म्हणाला.
या मुलाखतीत अजय देवगणसह तब्बूदेखील होती. एकदा अब्बास, मस्तान अजय देवगणच्या या सवयीमुळे कंटाळले होते अशी आठवण तिने सांगितली. ती म्हणाली की, “आम्ही अब्बास-मस्तान यांच्यासह छलिया नावाचा चित्रपट करत होतो. पण तो चित्रपट झालाच नाही. एकदा ते मला म्हणाले, आम्ही काय करावं. आमचा एक हिरो एका बाजूला वाकतो, हिरोईन दुसऱ्या बाजूला वाकते. आम्ही कॅमेरा कोणत्या बाजूने लावावा”.
अजय देवगणला या मुलाखतीत त्याच्या 90 च्या दशकातील हेअर स्टाईलबद्दलही विचारण्यात आलं. अजय देवगणचे केस कपाळावर असायचे आणि अनेक तरुण ही स्टाईल फॉलो करायचे. यावर अजयने सांगितलं की, “10-12 वर्षांपूर्वीपर्यंत अभिनेत्यांकडे हेअर ड्रेसर नव्हता. मेक-अप आर्टिस्टकडे एक कंगवा असायचा. तो कंगवा किंवा हात फिरवायचा आणि तयार व्हायचो. आंघोळ करुन घरातून निघाल्यावर जसे केस असायचे तसेच ते दिवसभर राहायचे”.