बॉलिवूड अभिनेता गोविंदाने चुकून स्वत:वर गोळी झाडली असून, त्याला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान गोविंदाला रुग्णालयात भेटण्यासाठी त्याची मुलगी टीना अहुजा पोहोचली आहे. गोविंदाच्या भावानेही त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट जिली आहे.
डॉक्टर अग्रवाल यांनी मीडियाशी संवाद साधताना सध्याची त्याची प्रकृती स्थिर असून 8 ते 10 टाके लावल्याचं सांगितलं आहे. 5 वाजता ते माझ्याकडे आले होते. 6 वाजता आम्ही त्यांच्यावर उपचार केले. यामध्ये जवळपास दीड तास गेले अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान गोविंदाला डिस्चार्ज कधी देणार असं विचारण्यात आलं असता डॉक्टर म्हणाले, फार लवकर दिला जाईल, कदाचित दोन दिवस लागतील. गोविंदाला नेमकी जखम कुठे झाली आहे असं विचारलं असता त्यांनी गुडघ्याच्या दोन इंच खाली असं उत्तर दिलं.
मुलगी टीना अहुजाने घेतली वडिलांची भेट
वडिलांनी गोळी लागल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलगी टीना अहुजा रुग्णालयात पोहोचली होती. तिचे कारमध्ये बसलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान तिने कोणतंही भाष्य केलं नाही. वडिलांची भेट घेतल्यानंतर काहीही न बोलता ती निघून गेली.
याआधी गोविंदाचा भाचा कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहदेखील गोविंदाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. मंगळवारी मुंबईतील राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून चुकून सुटलेली गोळी पायाला लागून गोविंदा जखमी झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. गोविंदा विमानतळावर जाण्यासाठी निघत असताना हा सर्व प्रकार घडला.
मीडियाशी बोलताना गोविंदाचा भाऊ कीर्ती कुमार म्हणाला, “जर तो बरा झाला तर आज संध्याकाळीच घऱी जाऊन. इतक्या आशा तर आहेत. पायाच्या अंगळ्याला गोळी लागली आहे. तो आपली रिव्हॉल्वर तपासत होतो. हातातून रिव्हॉल्वर खाली पडली आणि गोळी सुटली. त्याची तब्येत सुधारत आहे”.
गोविंदाचा ऑडिओ मेसेज
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासात गोविंदाने एक ऑडिओ क्लिप जारी करून त्याच्या चाहत्यांना त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. “माझे चाहते, माझे आई-वडील आणि देव यांच्या आशीर्वादाने, मी आता चांगली स्थितीत आहे. मला गोळी लागली होती, जी आता काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टर डॉ अग्रवाल यांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थनेबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. “असं अभिनेता म्हणाला.
नेमकं काय झालं?
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 4.45 च्या सुमारास तो एका शोसाठी कोलकाता येथे 6 वाजताचे फ्लाइट पकडण्यासाठी घरातून निघणार होता. अभिनेता परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना ट्रिगर चुकून ढकलला गेला. त्यानंतर एक गोळी त्याच्या पायाला लागली.