Advantages and Disadvantages of Vegetarian Food: दरवर्षी जगभरात 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिवस म्हणून साजरा केला जातो. आजकाल शाकाहार स्वीकारणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आरोग्याच्या कारणांमुळे लोक मांसाहार दूर करून शाकाहाराकडे वळत आहेत. जागतिक शाकाहारी दिवसाची सुरुवात 1977 मध्ये झाली. या दिवसमागचा उद्देश शाकाहारी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे. शाकाहारी असण्याचे अनेक फायदे आहेत परंतु त्याचे काही तोटेही आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हृदय राहते निरोगी
शाकाहारामुळे कमी सॅच्युरेटेड फॅट शरीरात जातात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी होते. एवढेच नाही तर रक्तदाब नियंत्रणात राहते. या कारणांमुळे हृदय निरोगी राहते.
पचनक्रियाही उत्तम राहते
मांसाहारापेक्षा शाकाहारी अन्न पचायला नेहमी सोपे असते. शाकाहारी पदार्थात फायबरही चांगल्या प्रमाणात आढळते. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होते.
वजन कंट्रोलमध्ये राखण्यासाठी आहे फायदेशीर
शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त फॅट्स नसतात. जास्त फॅट्सनसल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राखण्यासाठी शाकाहारी जेवण फायदेशीर ठरते. या उलट मांसाहार करणाऱ्यांना वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
काय आहेत तोटे?
शाकाहारी पदार्थ खाणे चांगलेच आहे. परंतु हा आहार योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. जर शाकाहार घेणाऱ्या लोकांनी योग्य आहार घेतला नाही तर त्यांना व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3, कॅल्शियम, प्रथिने अशा पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. याची कमतरता झाल्यास कधीकधी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. लक्षात घ्या, आहाराचा समतोल साधला तर शाकाहारी पदार्थांचे अनेक फायदे होतील. आजकालच्या फास्ट फूडचा ट्रेंडमध्ये खाण्याच्या सवयी खूप बिघडल्या आहेत. शाकाहारी लोकांसाठीही तेलकट पदार्थ आणि जंक फूडचे भरपूर पर्याय आहेत. हे पदार्थ शरीराला अजिबात फायदेशीर ठरत नाहीत. या उलट हे शरीराचे खूप नुकसान करतात. त्यामुळे तेलकट, फास्ट फूड आणि गोड पदार्थ खाणे टाळा.
आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा
जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, हंगामी फळे, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारचे धान्य, सुका मेवा, नट, बिया अशा पदार्थांचा समावेश करा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)